जितेंद्र कोठारी, वणी : गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी सकाळ पासून निर्गुडा नदीच्या घाटावर भाविकांची गर्दी सुरु झाली. शहरात हजारोच्या संख्येने घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. कोणी दीड दिवसानंतर तर कोणी तीन दिवसानंतर, कोणी पाच दिवसानंतर तर कोणी सात दिवसानंतर गणपती विसर्जन करतात. काही लोक अनंत चतुर्थीला म्हणजेच दहा दिवसानंतर गणपती विसर्जन करतात.
गणपती जसा वाजत गाजत येतो तसा त्याचा निरोप समारंभ सुद्धा तितकाच वाजत गाजत होतो. विसर्जनासाठी गणपतीचे वेगवेगळ्या वाहनांमध्ये आगमन होताना दिसले. कार, ऑटोरिक्षा, टेम्पो, ट्रॅक्टर, दुचाकीवर गणपतीला घेऊन भाविक नदी घाटावर पोहचले. घाटावर गणपतीची विधिवत पूजा आरती करून नदीमध्ये विसर्जन करण्यात येत आहे. घरगुती गणपतीचे विसर्जन मंगळवार सकाळपासून सुरु आहे. तर सार्वजनिक गणपती विसर्जन सायंकाळ पासून तर मध्यरात्री पर्यंत सुरु राहणार आहे. गणपती भक्तांची गर्दी लक्षात घेता वाहतूक व पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे.
निर्माल्य संकलनाची व्यवस्थाच नाही
गणपती विसर्जन करताना भक्तांकडून निर्माल्य नदीत प्रवाहित केल्यामुळे नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतेय. तारेंद्र बोर्डे हे वणी नगर परिषदचे अध्यक्ष असताना गणपती विसर्जनासाठी सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश आणि स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर एक वर्ष रोटरी क्लब ऑफ वणी तर्फे निर्माल्य संकलन करण्यात आले. मात्र यंदा अशी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे भाविक फुलमाळा, गौरी व इतर निर्माल्य नदीचे पाण्यात प्रवाहित करताना दिसून आले.