जितेंद्र कोठारी, वणी
हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार 8 सप्टेंबर रोजी जाहीर झाला. भारतीय जनता पक्षाने 48 जागा जिंकून हरियाणात बहुमत मिळविले आहे. मात्र हरियाणाच्या हा निकाल महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांना धडकी भरवणारा आहे. त्याचे कारण भाजपने हरियाणात राबविलेले गुजरात पॅटर्न आहे.
अँटी इन्कमंसी फॅक्टर टाळण्यासाठी भाजपने निवडून आलेले 16 आमदारांचे तिकीट कापले होते. 2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ने विद्यमान 40 टक्के आमदारांचे तिकीट कापले होते. आणि निवडणुकीत भाजपला विजय मिळाला. त्याच धर्तीवर हरियाणा विधानसभा निवडणुकीतही भाजपने 16 विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नवीन चेहरे उतरविले.
पुढील नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपचा जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी विद्यमान आमदार की नवीन चेहरा ? याबाबत वेगवेगळ्या कंपनीकडून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. भाजपने जर गुजरात आणि हरियाणा पॅटर्न राज्यात राबविला तर अनेक विद्यमान भाजप आमदारांना घरी बसण्याची वेळ येणार आहे.