वणी टाईम्स न्युज: मागील काही वर्षांपासून वणी नगर परिषदेमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी व भ्रष्टाचारी कारभारामुळे नगर परिषदेची आर्थिक व प्रशासकीय अवस्था डबघाईस आली असून, आता या डबघाईस आलेल्या परिषदेच्या तिजोरीस वाचवण्यासाठी सामान्य जनतेवर अवाजवी व जीवघेणे कर लादण्याचे नियमबाह्य कृत्य प्रशासकाद्वारे करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला आहे.
माजी आमदार नांदेकर यांनी सोमवार 22 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षांपासून नगर परिषदेच्या कारभारात रस्ते, भूमिगत नाल्या व बगीचे यांनाच विकासाचे नाव दिले गेले. मात्र, त्यासाठी शासकीय योजनांतून मिळालेल्या निधीचा व स्थानिक मालमत्ता कराचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे येत्या 29 सप्टेंबर रोजी शिवसेना (शिंदे) गट वणी नगर परिषदेवर जन आक्रोश मोर्चा काढून कर पावतीची होळी करणार आहेत.
जलशुद्धीकरण केंद्र ठप्प – लोकांना धोकादायक पाणीपुरवठा
शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीपुरवठा. अनेक वर्षांपासून जलशुद्धीकरण केंद्र मृत अवस्थेत असून, नागरिकांना ब्लिचिंग पावडर व आलम यांचा वापर करून पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी वणी शहरात किडनीचे आजार, त्वचारोग, पिवळ्या तापाचे (पिलिया) रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून नगर परिषद प्रशासनाने केवळ मलाई मिळणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप नांदेकर यांनी केला.
बिल्डर्स-डेव्हलपर्सना फायदा, जनतेला धोका
जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करून निवडक बिल्डर्स, डेव्हलपर्स व कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी नगर परिषद क्षेत्राची हद्दवाढ करण्यात आली आहे. तिजोरीत पैशांचा खडखडाट असताना देखील निर्मनुष्य भागांचा समावेश करून हद्दवाढीचा घाट घातला गेला आहे. विविध योजना आणि विकासकामांचे प्रारूप आखून केवळ सरकारी खजिन्यावर तुटीचा बोजा वाढवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप नांदेकर यांनी केला.
जनतेला आवाहन
“वणी शहरातील जनतेवर लादण्यात आलेल्या नव्या करवाढीचा भरणा करू नये. हे जनविरोधी निर्णय मागे घ्यावे यासाठी नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे,” असे आवाहन माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी या निवेदनातून केले आहे.