जितेंद्र कोठारी वणी : ‘डर के आगे जीत है…’ एका जाहिरातीमध्ये ही टॅगलाइन वापरण्यात आली होती. मिहीर या नाटकाचा नायक. त्याच्या मनातील भीती, करिअरच्या मागे धावताना होत असलेली घुसमट. एका क्षणी त्याच्या हातून झालेली चूक आणि त्याबद्दल त्याला जबर मानसिक ताण सहन करावा लागतो. त्याच्या चुकीची किंमत त्याच्या बायकोला म्हणजे मधूला भोगावी लागणार असते. तसं तो ठरवतो देखील. स्वत:च्या अॅड एजन्सीच्या जागेसाठी त्याने स्वप्न पाहिलेली असतात. त्याच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्याचा बॉस त्याला जाळ्यात ओढतो . बॉस त्याची पत्नी सोबतच्या संबंधांचे चित्रण करून मधूसोबत ‘वन नाइट स्टँड’ साठी मिहीरला ब्लॅकमेल करतो.
‘अजूनही चांदरात आहे’ चे नायक व नायिका मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनाही या जगाची भुरळ नाही पडली तर नवलच. पूर्वार्धात काटकसरीने जीवन जगणारे दुसऱ्या अंकात दोघेही थोडेसे उंची आयुष्य जगताना दिसतात. मिहीर हा अस्वस्थ, पटकन चिडणारा पण मनाने तेवढाच सरळ. मधू मात्र मिहीरवर प्रचंड विश्वास असलेली. कोणत्याही परिस्थितीतून आपण मार्ग काढूच हा विश्वास असणारी. आणि म्हणूनच मिहीरने तिला बॉसकडे जाण्याचे सांगूनही रात्रभर मैत्रिणीकडे राहून, पुन:श्च मिहीरच्या प्रेमावर, सरळपणावर विश्वास दाखवून… अजूनही चांदरात आहे याची पक्की खात्री एकमेकांना देतात आणि पडदा पडतो. दोनच मुख्य पात्र असलेली ही संहिता.
मिहीर आणि मधूच्या सहजीवनाची कहाणी ‘अजूनही चांदरात आहे’ या नाटकाचे वणी येथील सागरझेप बहुउद्देशीय संस्थेच्या कलाकारांनी चंद्रपूर येथे सुंदर प्रस्तुतीकरण केले. चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात 1 डिसेंबर रोजी या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. नाटकाचे लेखक इरफान मुजावर यांनी संवेदनशीलतेने ही कहाणी मांडली आहे.
मिहीर आणि मधू या दोघांच्याही भूमिका गौरव खोंड आणि अपूर्वा खनगन यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. अपूर्वाने अतिशय संयमाने आणि ताकदीने मधू उभी केली. गौरव खोंड यांचा मिहीर देखील उल्लेखनीय. त्याची अस्वस्थता, त्रागा, सरळ वागणे हे मोठ्या तडफेने दाखवण्यात गौरव यशस्वी ठरले. बॉसच्या भूमिकेला संस्थेचे अध्यक्ष हरहुन्नरी कलाकार सागर मुने यांनी नाटकाचा सस्पेन्सला येऊन आपल्या कलेला योग्य न्याय दिला.
दिग्दर्शक सारंग मास्टे यांनी संहितेवरील पकड सिद्ध केली. मोठ्या कल्पकतेने दोघा कलाकारांकडून कामगिरी करवून घेण्यात ते यशस्वी ठरले. आणि एका सशक्त संहितेचे प्रभावी सादरीकरण केले. ऋषभ धापोडकर प्रकाश योजना तर शुभम पिंपळकर नेपथ्य मधून मिहीर व मधूच्या जीवनमानातील फरक दाखवण्यात यशस्वी ठरले. धनंजय बोरीकर यांचे पार्श्वसंगीत प्रवाही आणि प्रभावी होते. अशा प्रकारे एका उत्तम नाटकाची मेजवानी चंद्रपूरकर प्रेक्षकांना मिळाली.