जितेंद्र कोठारी, वणी : (संपादकीय) तुळशीचे लग्न लागल्यानंतर आता लग्नांचे मुहूर्त सुरु झाले आहे. लग्नसराईची लगबग सगळीकडे दिसून येत आहे. आपल्याकडेही लग्नाची किंवा साखरपुड्याची अनेक पत्रिका आल्या असेल. काही पत्रीकावर ‘आग्रहाचे निमंत्रण’ तर काही पत्रिकावर ‘आपणास आमंत्रण’ असे छापलेले तुम्हाला दिसून पडेल. ‘आमंत्रण’ आणि ‘निमंत्रण’ हे दोन्ही शब्द सारखेच ! मग यात वेगळेपणा काय ? तर चला जाणून घेऊन या दोन्ही शब्दांमध्ये काय फरक आहे.
आधी आपण आमंत्रण संदर्भात बोलूयात. सामान्यपणे ज्या कार्यक्रमाची काही विशेष रूपरेषा नसेल आणि ज्यांना कार्यक्रमात बोलावलं आहे त्यांनी त्या कार्यक्रम सुरु असताना कधीही आपली उपस्थिती दर्शविली तरी हरकत नाही. अशावेळेस आमंत्रण दिले जाते. आमंत्रित व्यक्ती त्या कार्यक्रमाला आली नाही तरी कार्यक्रम पार पडणारच. अशी परिस्थिती असते तेव्हा ‘आमंत्रण’ दिले जाते. अशा कार्यक्रमामध्ये मुहूर्ताला फारस महत्व नसते. उदाहरणार्थ लग्नाचं रिसेप्शन, वाढदिवस पार्टी, किंवा एकाधा कार्यक्रम सुरु असताना मंचावर आमंत्रित करणे.
दुसरीकडे ठराविक व्यक्ती किंवा व्यक्तीशिवाय नियोजित कार्यक्रम पार पडू शकणार नसेल तर त्या व्यक्तीला ‘निमंत्रण’ दिलं जाते. निमंत्रित व्यक्तीची कार्यक्रमात हजेरी आवश्यक असते. त्यामुळे निमंत्रित व्यक्तींची वेळेत उपस्थिती राहणे बंधनकारक असते. उदाहरणार्थ लग्न समारंभ, मुंज कार्यक्रम किंवा एकाद्या समारंभाचे उद्घाटक, प्रमुख अतिथी, वक्ते यांना निमंत्रण दिले जाते. आमंत्रणामध्ये आपुलकीची भावना जास्त असते तर निमंत्रण हे औपचारिकता म्हणून दिले जाते. असे जाणकारांचे मत आहे. आमंत्रण आणि निमंत्रण यात फरकाबद्दल अनेक मतमतांतरही आहे.
टिप : वरील माहिती ‘वणी टाईम्स’च्या वाचकांसाठी ‘खलबत्ता’ इन्स्टाग्राम पोस्टवरुन साभार आणि संपादित. वरील माहिती बाबत आपले विचार भिन्न असू शकते.