वणी टाईम्स न्युज : शहरात शुक्रवारी शासकीय मैदानावर दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला. यानिमित्त शासकीय मैदान परिसराच्या चौकातील रस्ते फुल्ल झाले होते. जल्लोषी वातावरणात दहीहंडी फोडत मंडळांनी मानाची पारितोषिके मिळविली. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली आणि गोविंदांचा उत्साह देखील वाढला. पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या दहीहंडी उत्सवाचे आयेजन करण्यात आले होते.
मनसेच्या वतीने राजू उंबरकर यांच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे तरुणाईसह, महिला भगिनींनी या उत्सवाला मोठी गर्दी असते. यावेळी सर्वांनी डीजे च्या तालावर थिरकत आपला आनंद द्विगुणित केला आहे. याप्रसंगी ब्राम्हणवाडी थडी येथील प्रभू श्रीराम भक्त परिवार गोविंदा पथक सामील झाले होते. यावेळी छोटी दुर्घटना घडली आणि या पथकातील तेजस रेखाटे हा जखमी झाला. परंतु याची तात्काळ दखल घेऊन राजू उंबरकर यांच्या आदेशाने या गोविंदाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वैद्यकीय मदत दिली गेली आणि या सर्व पथकाला सुखरूप पोचवण्यात आले.
गोपाळकाला निमित्त शुक्रवारी शहरात मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री माधुरी पवार यांच्या नृत्याने वणीकरांना भुरळ पडली. महाराष्ट्रातील नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित केले होते. यावेळी प्रसिद्ध म्युझिक साऊंड सिस्टीम असल्याने तरुणांनी तसेच महिला भगिनींनी नाचण्याचा आनंद घेतला. विविध जिल्ह्यातील विजेत्या गोविंदा पथकांना बक्षीस मानधन सिनेअभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते आणि मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले. यावेळी अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बी – बियाणे वाटप करण्याची घोषणा उंबरकर यांनी केली. मागील वर्षी देखील दहीहंडीच्या निमित्ताने वणीतील युवकांसाठी रोजगार मेळावा घेण्याची घोषणा केली होती. रोजगार मेळावा घेऊन यामाध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला.
राजू उंबरकर यांच्या कामाची शैली वणी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नागरिकांना माहिती आहे. मनसेचा कार्यक्रम म्हटल की, विधानसभा क्षेत्रातील असंख्य नागरिकांना काहीतरी नवीन बघायला मिळेल म्हणून तरुण-तरुणी व ज्येष्ठ नागरिक माता-भगिनी आवर्जून सदर कार्यक्रमाला उपस्थित राहतात. याचाच प्रत्यय काल झालेल्या मनसे दहीहंडी उत्सवात बघायला मिळाला.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना बी बियाणे मोफत देण्याची घोषणा
मागील वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी पूर परिस्थितीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना राज ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजने मार्फत मदत केली होती. यावर्षी दहीहंडी उत्सवातही राजू उंबरकर यांनी आगामी काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याची घोषणा केली. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले याप्रमाणे राजू उंबरकर हे विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी देवदूत म्हणून काम करतात. यावेळीसुद्धा या योजनेची घोषणा केल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा केला सत्कार
मारेगाव तालुक्यातील विलास जट्टे हा साधा माणूस म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या व्हिडिओ टाकत असतो. त्या अनुषंगाने राजू उंबरकर यांनी त्यांचा व्यासपीठावर सत्कार केला. अतिशय सामान्य कुटुंबातील असलेला विलास जट्टे समाजातील शेतकऱ्यांवर अतिशय सकारात्मक रिल्स टाकत असतो. त्यावेळी त्यांची परिस्थिती नसल्यामुळे तो चित्रपटात काम करू शकला नाही अशी खंत व्यक्त केल्यानंतर राजू उंबरकर यांनी चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून येत्या काळात चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देऊ असे त्याला आश्वासन दिले.