जितेंद्र कोठारी, वणी : शिरपूर पोलिसांनी चारगाव चौकी येथे सापळा रचून चारचाकी वाहनातून विदेशी दारूची तस्करी उघडकीस आणली. रविवार दुपारी 12.30 वाजता दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एक डस्टर कार व 180 मिली क्षमतेच्या 72 नग आरसी दारूचे पव्वे जप्त केले. पोलिसांनी डस्टर वाहनाचे चालकाला अटक केली तर तस्करी करणारा मुख्य आरोपी मात्र फरार झाला.
शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली कि वणी वरून शिंदोलाकडे एका कार मध्ये विदेशी दारूचे बॉक्स घेऊन जात आहे. माहितीवरून चारगाव चौकी येथे नाकाबंदी करून डस्टर कार क्रमांक MH 29 AR 1638 या वाहनाची झडती घेतली असता त्यात आरएस कंपनीच्या 180 मिली क्षमतेच्या 72 शिशी किमत 12 हजार 960 रुपये मिळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी वाहन व दारूसह 5 लाख 12 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर प्रकरणी वाहन चालक राजू मारोती अलीवर रा. गायकवाड नगर वणी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता वाहन व त्यातील दारू शेख आरिफ शेख इब्राहीम याच्या मालकीचे असल्याची कबुली दिली. पोलिसांनी चालकाला अटक करून दोघांविरुद्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 (अ) (इ) व कलम 109 भादविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे ठाणेदार सपोनि संजय राठोड, सुगत दिवेकर, आशिष टेकाडे, राजन इसनकर, अंकुश कोहचाडे यांनी केली.