वणी (यवतमाळ) : रेती तस्करी विरुध्द महसूल विभागाच्या सतत कारवाया आणि बंदोबस्तामुळे पारंपरिक हायवा ट्रकद्वारे रेतीची तस्करी करणे तस्करांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. परिणामी तस्करांनी आता नवा मार्ग अवलंबला असून लांब पल्ल्याच्या ट्रान्सपोर्ट ट्रकचा वापर करून रेतीची वाहतूक करण्याचा नवीन फंडा उजेडात आला आहे.
गुरुवार 1 मे रोजी सकाळी 8.30 वाजता वणी महसूल विभागातील नायब तहसीलदार अशोक ब्राह्मणवाडे, पटवारी सुनील उराडे व पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत यवतमाळ बायपासवर राजूर रेल्वे क्रॉसिंग जवळ 16 चाकी ट्रक पकडला. हा ट्रक वरून झाकलेला होता आणि त्यावरून तो कोणत्याही प्रकारचा सामान्य मालवाहू ट्रक असल्याचे भासवत होता. मात्र, तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 4 ते 5 ब्रास रेती अवैधरित्या वाहून नेली जात असल्याचे उघड झाले.
महसूल पथकाने त्वरित कारवाई करत TATA LPT 4830 ट्रक क्रमांक MH-29 BE 0800 ताब्यात घेतला. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी वापरला जाणारा असून तस्कर त्याचा वापर करून रेतीची चोरी महसूल यंत्रणांच्या नजरेतून लपवू पाहात होते. पकडलेला ट्रकची यवतमाळ परिवहन विभागात मोहम्मद सलीम अंसारी यांचे नावाने नोंद असल्याचे कळते. जप्त केलेला ट्रक हा रापनि डेपो आवारात उभा करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचे म्हणणे:
महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “तस्कर आता पारंपरिक ट्रकऐवजी रंगवलेले, सजावलेले ट्रान्सपोर्ट ट्रक वापरत आहेत, जे मोठ्या अंतरावर माल वाहून नेण्यासाठी वापरले जातात. यामुळे तपासणी टाळता येते असा त्यांच्या मनात गैरसमज आहे. मात्र महसूल विभाग अशा कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवून आहे.”
स्थानिकांची प्रतिक्रिया:
स्थानिक नागरिकांनी महसूल विभागाच्या कारवाईचे स्वागत केले असून अधिक कडक उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. “अवैध रेती तस्करीमुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता या नवीन क्लृप्त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.