वणी टाईम्स न्युज : शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची मोठी खेप येणार असल्याची गोपनीय माहितीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस पथकाने पहाटे 4.30 वाजता येथील सिंधी कॉलनीमध्ये एका घराजवळ सापळा लावला. मात्र खबरीने दिलेली टिप लीक झाली की काय ? तंबाखू घेऊन येणारा वाहन सकाळी 6 वाजेपर्यंत आलाच नाही. शेवटी पोलीस अधिकाऱ्यांनी संशयित घराची झडती घेतली. यात पोलिसाना विविध ब्रँडचा 1 लाख 6 हजार 510 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळला.
एकाद्या सिनेमाच्या स्टोरीला शोभेल किंवा आयकर विभागाच्या धाडीप्रमाणे मंगळवार 18 फेब्रुवारी रोजी पहाटे राबविलेल्या या कारवाईत पोलिसांनी तंबाखू विक्रेता रोहित सुभाष तारुणा (28) रा. गुरुनानक नगर, सिंधी कॉलोनी वणी यास अटक केली. फिर्यादी अन्न व औषध प्रशासन यवतमाळ येथील अन्न सुरक्षा अधिकारी सीमा सुरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी विरुध्द कलम 26 (1), 26 (2) (iv), 27(3)(e), 30(2)(a), कलम 3(1)(zz)(iv), 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, 123, 274, 275, 223 भारतीय न्याय संहीता 2023 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सदर कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर, PSI शेखर वांढरे, ASI सुरेंद्र टोंगे, हेड कॉन्स्टेबल मारोती पाटील, दीपक मडकाम, कॉन्स्टेबल शाम राठोड, विजय गुजर, महेश बाडलवार, प्रफुल नाईक, महिला पोलीस जया रोगे, चैताली यांनी केली.
तंबाखू तस्करांवर कार्यवाही कधी होणार ?
प्रतिबंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर करण्यात आलेल्या या कारवाईला पोलिसांना उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणून बोलले जात आहे. मागील 2 वर्षापासून चंद्रपूर व नागपूर येथून वणी शहरात मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखू, गुटखा व सुपारीची तस्करी सुरु आहे. पोलीस ठाण्याच्या भिंतीला लागून सिंधी कॉलनीत चावला नामक इसमाचा बनावट तंबाखू पॅकिंगचा कारखाना सुरु असल्याची चर्चा आहे. तर राजूर गावाजवळ एका शेतात खर्रा सुपारीचा कारखाना सुरु असल्याची माहिती आहे. चंद्रपूर येथील मकसूद गुटखा व तंबाखू तस्करीचा मोठा सूत्रधार आहे. आता वणी पोलीस यांच्यावर कारवाई कधी करणार ? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहेत.