वणी टाईम्स न्युज: रोड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरसह त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून कंपनीच्या प्लॉटवर घेऊन जाऊन शिवीगाळ व मारहाण केल्याची गंभीर घटना शनिवार 20 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात मनसे नेता राजु उंबरकर व त्यांचे इतर साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115 (2), 127 (2), 352, 351(3), 329(3), 191(2), 189(2) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी कन्स्ट्रक्शन कंपनी चंद्रपूरचे प्रोजेक्ट मॅनेजर अजय सूदामजी हिंगाणे (49) रा. महादेव मंदिर वार्ड, बाबूपेठ, चंद्रपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिबला ते घोन्सा, रासा, वणी, नांदेपेरा ते वडकी या रस्त्याच्या बांधकामावर ते देखरेखचे काम करतात. दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता ते आपल्या सहकाऱ्यांसह घोन्सा परिसरात जिनिंग जवळ रस्त्याचे काम तपासत असताना राजु उंबरकर व त्याचे साथीदार दोन चारचाकी गाड्यांमधून घटनास्थळी आले. त्यांनी प्रथम कामगार निरपेंद्र पटेल याला कामाबाबत विचारणा केली. पटेल यांनी हिंदी भाषेत उत्तर दिले असता उंबरकर यांनी ‘मराठीत बोल’ अस म्हणून थापडा मारल्या. त्यानंतर फिर्यादी अजय हिंगाणे यांनाही गालावर थप्पड मारून धमक्या देण्यात आल्या.
सदर घटनेत फिर्यादीसोबत असलेल्या सागर तन्नीरवार यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर सर्वांना जबरदस्तीने फिर्यादीच्या चारचाकी वाहनात बसवून रासा येथील कंपनीच्या प्लांटवर नेण्यात आले. तिथे पुन्हा मोठमोठ्याने शिवीगाळ करत ठेकेदाराला बोलविण्याची मागणी करण्यात आली. ठेकेदार तब्येतीच्या कारणाने उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितल्यावर उंबरकर यांनी “मालकाला उद्या माझ्याकडे पाठवा, नाहीतर प्लांट जाळून टाकीन” अशी धमकी दिली. याचवेळी बाहेर राज्यातील कामगार दिलखुस कुमार व मनखुश कुमार यांनाही विनाकारण मारहाण करण्यात आली. या प्रकरणी फिर्यादीच्या जबानीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अंकुश वडतकर, पोलीस स्टेशन वणी हे करीत आहेत.