वणी टाईम्स न्युज : वणी तालुक्यातील सावर्ला गावातून एका अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलाच्या मोठी बहीण हिने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 137(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कु. XYZ (20), रा. सावर्ला, हिने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिचा लहान भाऊ (16 वर्षे 4 महिने) रा. सावर्ला हा दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी सुमारास 12 वाजता घरी कोणालाही काही न सांगता बाहेर गेला. त्यानंतर तो परत आला नाही. गावात व नातेवाईकांकडे शोध घेऊनही मुलगा मिळून आला नाही.
बेपत्ता मुलाचे वर्णन असे – रंग गोरा, उंची पाच फुट, बांधा सडपातळ, केस काळे, अंगात काळ्या रंगाचा पँट व निळ्या रंगाचा रेषा असलेला शर्ट. त्याचे अज्ञानाचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्याला फुस लावून पळवून नेल्याची शक्यता नाकारता येत नाही. बेपत्ता मुलाच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील असून, नागरिकांना काही माहिती मिळाल्यास तातडीने वणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.