सुशील ओझा झरी : मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत परसोडा येथील सात महिन्यांची गरोदर नवविवाहित महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 30 सप्टेंबर रोजी घडली होती. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु 2 ऑक्टोंबर रोजी मृतक पायल उरकूडे हीची आई संगीता गजानन चार्लिकर रा. नवरगाव हिने मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये तिच्या मुलीला सासरकडील मंडळीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली.
फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीनुसार मृतक पायलचे सासू, सासरे पती व नणंद तिला माहेरहून घर कामाकरिता हुंडा म्हणुन 1 लाख रूपये घेवून येण्यासाठी शिवीगाळ तसेच शाररिक व मानसिक त्रास देवून छळ करीत होते. सततच्या त्रासाला कंटाळून सात महिन्यांची गरोदर असताना पायल हिने गळफास लावून केल्याचा आरोप पायलच्या आईने केला आहे.
तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी गौरव मारोती उरकुडे (24), मारोती बापूराव उरकुडे (50), मालुबाई मारोती उरकुडे (45) आणि निकिता मारोती उरकुडे (20) विरुध्द कलम 108, 85, 352, 351(2), 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रवीण हिरे व दीपक ताटे करीत आहे.