वणी टाईम्स न्युज : बँकेकडे गहाण ठेवलेले शेत कर्जदाराने परस्पर दुसऱ्याला विकले. याबाबत माहिती मिळताच बँक व्यवस्थापकाने वणी पोलीस ठाण्यात कर्जदार शेतकऱ्या विरोधात तक्रार नोंदविली. दादाजी साधू निखाडे, रा. कुंड्रा, ता. वणी असे गैर अर्जदार शेतकऱ्याचे नाव आहे.
फिर्यादी दि यवतमाळ अर्बन कॉपरेटिव्ह बँक, शाखा वणी तर्फे शाखा व्यवस्थापक अर्जुन महादेवराव उरकुडे यांनी तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार बँकेतील कर्जदार निखाडे किराणा स्टोअर्स, प्रोप्रा- दादाजी साधू निखाडे (70) रा. कुंड्रा, ता. वणी यांनी वर्ष 2009 मध्ये बँकेतून 1 लाख 30 हजार रुपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड सुरक्षा हमी म्हणून कर्जदार यांनी त्यांच्या मालकीची मौजा चिलई येथील शेत गट क्रमांक 74 क्षेत्रफळ 1.34 हे.आर. शेत जमीन नोंदणीकृत गहाण खत द्वारे गहाण ठेवली.
घेतलेल्या कर्जाची व त्यावरील व्याजाची परतफेड न केल्यामुळे बँकेने वसुली कार्यवाही सुरु केली. कार्यवाही सुरू असताना असे निदर्शनास आले की कर्जदार दादाजी साधू निखाडे यांनी बँकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सदर गहाण ठेवलेली शेत जमीन परस्पर सुरेंद्र काशिनाथ उरकुडे (डोर्ली) व संजय रामदास खाडे (कृष्णानपुर) यास दिनांक 16 मे 2017 रोजी नोंदणीकृत विक्री केली.
सदर शेत जमीन बँकेकडे गहाण असताना कर्जदार दादाजी साधू निखाडे (70) रा. कुंड्रा यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बेकायदेशीरपणे विकून बँकेची फसवणूक केली आहे. बँकेसोबत अपहार करून फसवणूक केल्याची तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दादाजी साधू निखाडे विरुद्ध कलम 406, 420 भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे.