वणी टाईम्स न्युज : ज्वलनशील डिझेल पदार्थाचा अवैधरित्या साठा करुन विक्री करण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. शिरपूर पोलिसांनी अवैधरीत्या साठा करून ठेवलेले 160 लिटर डिझेल पुरड (नेरड) येथून जप्त केला. डिझेल विक्री करणारा आरोपी हा पोलिसांची नजर चुकवून फरार झाला. राजू बाबाराव लडके असे आरोपीचे नाव आहे.
शिरपूर पो. स्टे. येथील पोलीस उप निरीक्षक रावसाहेब बुधवंत हे बुधवार 12 सप्टे. रोजी नाईट पेट्रोलिंगवर असताना त्यांना पुरड येथे अवैधरीत्या डिझेल साठा व विक्री होत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरुन त्यांनी पंचासह पुरड येथील राजु लडके यांच्या घराजवळ एका ठिकाणी ताडपत्री बांधून त्याच्या आडोसात ठेवलेले डीजल भरलेले 4 प्लास्टिक कॅन जप्त केले. प्रत्येक कॅन मध्ये 40 लिटर प्रमाणे पोलिसांनी 160 लिटर डिझेल किंमत 14 हजार 400 रुपये जप्त केला.
ज्वलनशील डिझेल अवैधरीत्या विक्री करणाऱ्या इसमाला नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव राजू बाबाराव लडके सांगितले. पोलीस कार्यवाही दरम्यान आरोपी हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. फिर्यादी PSI रावसाहेब बुधवंत पो. स्टे. शिरपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून फरार आरोपी राजू बाबाराव लडके (36) रा. पुरड, ता. वणी विरुद्ध कलम 287 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मुकुटबन मार्गावर डिझेल चोरीचा रॅकेट सक्रिय
मुकुटबन व परिसरात सिमेंट कारखाना, कोळसा, डोलोमाईट व चुनखडीच्या खाणी असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनाची दळणवळण आहे. या वाहनातून चोरी केलेले तसेच चालकांकडून डिझेल स्वस्त भावात खरेदी करून विक्री करण्याचा गोरखधंदा या रस्त्यावरील गणेशपुर, नेरड, पुरड, कायर, पेटूर गावात सर्रास सुरू आहे. भरवस्तीत धोकादायक ज्वलनशील पदार्थ साठा करुन ठेवल्यामुळे कदाचित मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.