वणी : मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरण परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह शेजारी मिळालेल्या स्कूल बॅग, मोबाईल व दुचाकीवरून मृतक हा वणी तालुक्यातील रासा गावातील प्रज्योत भीमराव मून (21) असल्याची ओळख पटली. मृतदेह जवळ मोनोसिल नामक कीटकनाशक द्रव्याचा डब्बा आढळल्याने तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
नवरगाव धरण प्रकल्प परिसरात जंगल आणि झाडझुडपे असल्याने अनेक तरुण तरुणी व शालेय विद्यार्थी या परिसरात वेळ घालवायला येतात. यापूर्वीही या परिसरात काही घटना घडल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रासा गावातील प्रज्योत मून हा मारेगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मंगळवारी सायंकाळी आपल्या मित्राची दुचाकी घेऊन प्रज्योत नवरगाव धरण परिसरात गेला आणि तिथेच त्यांनी कीटकनाशक औषधी पिऊन आत्महत्या केली.
प्रज्योत यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही. परंतु त्याच्या मृतदेह जवळ आढळलेल्या मोबाईलची तपासणीनंतर आत्महत्येमागे कारणेचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मारेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन नंतर मृतक प्रज्योतचे मृतदेह कुटुंबियाचे स्वाधीन करण्यात आले आहे.