वणी टाईम्स न्युज : एका सेकंदाची चूक माणसाच्या जीवावर बेतू शकते, याचा प्रत्यय मंगळवारी रात्री 12.30 वाजता दरम्यान धामणगाव रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवाश्यांना आला. पाण्याची बाटली घेऊन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात यवतमाळ येथील एका युवा व्यावसायिकाचा पाय घसरला आणि क्षणातच होत्याच नव्हते झाले. धावत्या रेल्वेच्या दोन डब्यांच्यामध्ये रुळावर पडल्याने त्याची मुंडकं धडावेगळे होऊन जागीच ठार झाला. निखिल दिलीप सराफ (43) राहणार यवतमाळ असे या दुर्दैवी घटनेत मृत व्यावसायिकाचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार निखिल सराफ आपले मित्र मुकेश भुतडा यांचेसह मुंबई जाण्यासाठी धामणगाव येथून सेवाग्राम एक्सप्रेस मध्ये बसला होता. डब्यामध्ये बसल्यानंतर त्याला जवळ पाणी नसल्याची आठवण आली. त्यामुळे तो पाण्याची बॉटल घेण्यासाठी परत प्लॅटफॉर्मवर उतरला. पाण्याची बॉटल खरेदी करताना रेल्वे सुरू झाली. त्यामुळे निखिल यांनी चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ट्रेनने गती पकडली होती.
रेल्वे कोचमध्ये चढण्याच्या प्रयत्न करीत असताना निखिलचा हात सुटला व त्याचा तोल जाऊन तो दोन डब्यांच्या मध्ये असलेल्या गॅपमध्ये पडला. यात रेल्वेचा चाक निखिलच्या मानेवरून निघाल्याने त्याचा मुंडक धडावेगळं झाला. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांनी चेन खेचून ट्रेन थांबवली. रेल्वे पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर निखिल सराफचे मृतदेह पोस्टमार्टम करून बुधवारी कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. या अपघातात मृतक निखिल सराफ यांच्या मागे आई, वडील, पत्नी व एक लहान मुलगा आहे.