वणी : विवाहित मुलीला भेटून मुलासोबत दुचाकीवर परत आपल्या गावी जात असताना घडलेल्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. मारेगाव वणी मार्गावर लालपुलीया परिसरात मंगळवारी सकाळी 10 वाजता दरम्यान ही घटना घडली. सुनंदा उत्तम रामटेके (52) रा. राजुरा जिल्हा चंद्रपूर असे या अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर दुचाकी चालवीत असलेला तिचा मुलगा गौरव उत्तम रामटेके (26) हा जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार राजुरा येथील सुनंदा रामटेके तिच्या विवाहित मुलीला भेटण्याकरिता पांढरकवडा येथे गेली होती. मुलीला भेटून मंगळवार 6 फेब्रु. रोजी तिचा मुलगा गौरव सोबत मोटरसायकल क्रमांक MH34BQ 3609 वर बसून वणी चंद्रपूर मार्गे परत राजुराकडे निघाली. दरम्यान करंजी चंद्रपूर महामार्गावर लालपुलीया परिसरात कलमना फाट्याजवळ MH29 BZ3805 क्रमांकाचे दुचाकी चालक किशोर सुरेश गेडाम रा. धोपटाळा यांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव व निष्काळजीपणे चालवून अचानक यु टर्न घेतला. सरळ रस्त्यावर अचानक दुचाकी आडवी आल्याने गौरव चालवीत असलेली मोटरसायकल समोरच्या दुचाकीवर जाऊन आदळली.
या भीषण धडकेत गौरवच्या मागे बसलेली तिची आई सुनंदा उसळून डिव्हायडरवर जाऊन पडली. डोक्याला डिव्हायडरची जबर मार लागल्यामुळे सुनंदा रामटेके ही जागीच गतप्राण झाली. तर दुचाकी चालक गौरव व दुसऱ्या दुचाकीचा चालक किशोर गेडाम हा जखमी झाला. अपघात घडताच नागरिकांनी तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सुनंदा रामटेके हिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच राजुरा, पांढरकवडा येथील व इतर नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली.
आईचा मृतदेह बघून मुलगी झाली बेशुद्द
काही वेळा पूर्वीच आपल्या घरून निघालेल्या आईचे अपघात झाल्याचे कळताच पांढरकवडा येथून तिची मुलगी वणी ग्रामीण रुग्णालयात पोहचली. एकदा आईचा चेहरा पाहण्याची विनवणी केल्यानंतर नातेवाईकांनी तिला पोस्टमार्टम कक्षात नेऊन सुनंदा हिचे मृतदेह दाखविले. परंतु शेवटची भेट घेऊन गेलेली आईचा मृतदेह पाहून ती जागीच बेशुद्द झाली. त्यामुळे नातेवाईकांनी तिला उचलून बाहेर आणले व खूप प्रयत्न केल्यानंतर ती शुद्धीवर आली.