वणी टाईम्स न्युज : वणी पोलीस स्टेशनचे वादग्रस्त ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांची अखेर बदली करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी शुक्रवार 31 जानेवारी रोजी अनिल बेहरानी यांना तात्काळ पोलीस मुख्यालयी रुजू होण्याचे आदेश काढले. बेहरानी यांच्या ठिकाणी पुसद ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गोपाल सुधाकर उंबरकर यांना वणी ठाण्याचा तात्पुरता प्रभार सोपविण्यात आला आहे. अनिल बेहरानी यांच्या 11 महिन्याच्या कार्यकाळात शहरात मटका, जुगार, दारु, गुटखा, अवैध व्यवसाय तसेच गोवंश कत्तल करण्याचे धंदे फोफावले होते.
वणी पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणाली विरोधात श्री रामनवमी उत्सव समिती अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी धरणे आंदोलन व स्वाक्षरी अभियान राबविला होता. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदने पाठविली. शिवाय 11 जानेवारी रोजी उघडकीस आलेले गोवंश कत्तलखाना प्रकरणात ठाणेदार बेहरानी यांनी चौकशीत हलगर्जीपणा केल्याचा ठपका गोसेवा आयोग समितीने आपल्या अहवालात ठेवला होता. गोसेवा आयोग समितीने नुकतेच तीन दिवसांपूर्वी आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुपूर्द केला होता. त्यावरून बेहरानी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.