जितेंद्र कोठारी, वणी : ग्रामीण भागात किराणा मालाचा पुरवठा व वसुली करुन येणाऱ्या वाहन चालक व हेल्परला 4 अज्ञात लुटारूंनी रस्त्यात अडवून मारहाण करुन वसुलीचे 80 हजार रुपये व मोबाईल लुटून फरार झाले. घोन्सा वणी मार्गावर कोरंबी (मारेगाव) येथील जनता शाळा समोर गुरुवार 16 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. घटनेबाबत फिर्यादी वाहन चालक जितेंद्र तुळशीराम रींगोले (32) रा. मुर्धोनी यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
प्राप्त माहितीनुसार वणी येथील राजेश तारूना यांचे वाहेगुरु किराणा भंडार नावाचे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. ते ग्रामीण भागात लहान दुकानदारांना किराणा मालाचा पुरवठा करतात. गुरुवारी त्यांनी आपले ॲपे तीनचाकी वाहनात किराणा माल भरुन वाहन चालक जितेंद्र रींगोळे याला घोंसा, रासा, दहेगाव येथे पाठविले. यावेळी ऑटॉमध्ये मदतनीस म्हणून लक्ष्मण मेश्राम हा सोबत होता.
किराणा माल पोहचून व जुनी वसुली घेऊन परत येताना वाटेत कोरंबी (मारेगाव) येथील जनता शाळेच्या पुढे दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ऑटो अडवून हेल्पर लक्ष्मण मेश्राम याला मारहाण सुरु केली. त्यावेळी ॲपे चालक जितेंद्र रिंगोळे यांनी प्रतिकार केला असता लुटारूंनी त्यालाही मारहाण केली व त्याच्या जवळ असलेली पैश्याची बॅग तसेच लक्ष्मण याचा विवो कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून दुचाकीवर बसून पळून गेले.
घटनेबाबत फिर्यादी जितेंद्र रिंगोळे यांनी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार लुटारूंनी हिसकावून नेलेल्या बॅगमध्ये किराणा मालाची वसुलीचे 80 हजार 700 रुपये होते. तसेच 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल असे एकूण 88 हजार 700 रुपयांची लूट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. वणी पोलिसांनी 30 ते 32 वयोगटातील 4 अनोळखी आरोपी विरुध्द कलम 394 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी करीत आहे.