वणी : येथील एमआयडीसी चौफुलीवर पायदळ रस्ता ओलांडताना युवकाला अज्ञात वाहनाने चिरडले. शनिवार 13 जाने. रोजी सायंकाळी 7.30 वाजता घडलेल्या या अपघातात लालगुडा येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. मंगेश ऋषीकेश बोरीकर (37) रा. आयटीआय जवळ लालगुडा असे या अपघातात मृत पावलेल्या युवकाचा नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहे.
प्राप्त माहितीनुसार लालगुडा येथील मंगेश बोरीकर हा एमआयडीसी परिसरात इंडो कोलवाशरी मध्ये वेल्डर म्हणून काम करीत होता. शनिवारी सायंकाळी 7 वाजता तो ड्युटी करून परत पायदळ घराकडे निघाला होता. दरम्यान लालगुडा चौपाटी येथे रस्ता ओलांडताना एका अज्ञात भरधाव वाहनाने त्याला चिरडले. या भीषण अपघातात मंगेश याच्या अंगावरून वाहन गेल्याने शरीर छिन्नभिन्न झाला. घटनेनंतर धडक देणारा वाहनचालक वाहनासह पसार झाला.
मंगेश याचा अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याचे भाऊ महेश व कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेत चंद्रपूर येथे नेत असताना वाटेतच मंदर जवळ मंगेशच्या शरीरात हालचाली बंद झाल्याने रुग्णवाहिका परत फिरवून वणी ग्रामीण रुग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी मंगेशची तपासणी करून मृत झाल्याचे घोषित केले. मृतक मंगेशचा लहान भाऊ महेश ऋषीकेश बोरीकर यांनी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकविरुद्द कलम 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून अपघात करून पसार झालेल्या वाहनाचा शोध पोलीस घेत आहे.