वणी टाईम्स न्युज : आई वडील शेतात कपाशीवर निंदन करीत होते. त्याचे दोन्ही मुलं त्यांच्या जवळ शेतातच खेळत होते. मात्र काही वेळाने 6 वर्षाचा मोठा मुलगा बेपत्ता झाला. सगळीकडे शोध घेऊन ही चिमुकला मिळून आला नाही. त्यामुळे वडिलांनी वडकी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या अल्पवयीन मुलाला कुणीतरी नजर चुकवून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.
फिर्यादी वडील संजय मारोती बोरकर (32) रा. सोनुर्ली, ता. केळापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची अडणी ता. राळेगाव शिवारात शेती आहे. शेतातील कपाशी निंदायची असल्यामुळे रविवारी सकाळी ते आणि त्याची पत्नी दोन्ही मुलं रुद्रा (6) आणि स्वराज (3) याला घेऊन शेतात गेले होते. पती पत्नी निंदण करीत असताना त्यांचे दोन्ही मुलं त्यांच्या जवळ खेळत होते.
दुपारी अडीच वाजता सर्वांनी शेतातच जेवण केला. जेवण केल्यानंतर संजय आणि त्याची पत्नी परत निंदनीच्या कामात लागले. तर त्याचे दोन्ही मुलं त्याच्या मागे काही अंतरावर शेतातच खेळत होती. अंदाजे 3 वाजता दरम्यान त्यांच्या लहान मुलगा स्वराज (3) त्यांच्याकडे आला. तेव्हा आईने त्याला रूद्रा कुठे असं विचारला असता त्याला काही सांगता आले नाही. घाबरलेल्या आईवडिलांनी मुलाच्या शोधात संपूर्ण शेत पिंजून काढला. तसेच आजूबाजूच्या शेतातही शोधले असता रुद्रा कुठेच मिळून आला नाही.
अखेर फिर्यादी यांनी वडकी पोलीस स्टेशन गाठून त्यांच्या मुलगा रुद्रा (6) याचा कुणी तरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. मुलगा हरवला त्यावेळी अंगात हाफ बाहांचा कत्था रंगाचा टी शर्ट घातलेला होता. त्याच्या उजव्या पायात काळा धागा बांधून आहे. गोरा वर्ण, सडपातळ आणि अंदाजे 3 फूट उंचीच्या या मुलाबाबत कोणाला माहिती मिळाल्यास पो. स्टे. वडकी येथे संपर्क साधावा.