वणी टाईम्स न्युज : एका मतीमंद युवती सोबत अनोळखी नराधमाने लैंगिक व अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. निर्गुडा नदीचे रामघाट परिसरात निर्जन स्थळी 1 मे रोजी दुपारी ही घटना घडली असून पीडित युवतीने तिच्या वडिलांना हकीकत सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर युवती मानसिकदृष्ट्या कमजोर असून, ती नदी परिसरात विट भट्टीजवळ एकटी फिरत असताना एका नराधमाने तिच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेत बळजबरीने निर्जनस्थळी काटेरी झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित युवतीला आई नसून तिनं घडलेल्या घटनेबाबत तिच्या वडिलांना सांगितले. फिर्यादी वडिलांनी तत्काळ वणी पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी पीडित युवतीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. वणी पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध कलम 64(1), 64(2) (1), 138,76,115 (2) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अनोळखी नराधमाचा शोध घेत आहे. पुढील तपास पीएसआय धनंजय रत्नपारखी करीत आहे.