वणी टाईम्स न्युज : शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे वणी शहर प्रमुख ललित सुरेशराव लांजेवार (45) यांचा 29 जानेवारी रोजी हृदयघाताच्या धक्क्याने अकस्मात निधन झालं होता. परंतु मृतक ललित लांजेवार यांची पत्नी श्रीरंगी ललित लांजेवार हिने शनिवार 1 फेब्रुवारी रोजी वणी पोलीस मध्ये दिलेल्या तक्रारीवरून एकच खळबळ उडाली आहे. ललितचा मृत्यू नैसर्गिक किंवा खराब आरोग्यामुळे नव्हे तर वणी पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या धमकीमुळे झाल्याचा आरोप श्रीरंगी लांजेवार यांनी तक्रारीत लावला आहे.
तक्रारीनुसार दिनांक 24 जानेवारी रोजी एका वृत्तपत्रात पोलीस आणि रेती तस्करी बाबत एक बातमी प्रकाशित झाली होती. सदर बातमी ललित लांजेवार यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर फॉरवर्ड केली. त्यामुळे चिडून वणी पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार विकास धडसे यांनी ललित याला अट्रोसिटी ॲक्टच्या गुन्ह्यामध्ये फसविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विकास धडसे यांनी दिलेल्या धमकीमुळे ललित प्रचंड तणावात आला होता. त्यांनी याबाबत यवतमाळ जिल्हा पालकमंत्री संजय राठोड यांना लेखी कळविले होते. मानसिक तणावामुळे ललितच्या छातीत कळ येऊन त्यांना हार्ट अटॅकचा स्ट्रोक आला व यातच त्यांचा मृत्यू झाला. असा आरोप श्रीरंगी लांजेवार हिने लावला आहे. पतीच्या मृत्यूमागे पोलीस हवालदार विकास धडसे हेच जबाबदार असून मला न्याय मिळावा असं तक्रारीत म्हटले आहे.
मृतक ललित लांजेवार यांच्या पत्नीची तक्रार मिळाली आहे. मी आजच वणी पोलीस स्टेशनचा प्रभार हाती घेतला आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करू.
गोपाल उंबरकर – पोलीस निरीक्षक, पो. स्टे. वणी