वणी टाईम्स न्युज : क्षुल्लक वादातून एका तरुणावर चाकू हल्ला करण्याची घटना सोमवारी 12 वाजता घडली. सुदैवाने वार चुकल्याने चाकू तरुणाच्या पाठीवर खरचटलं आणि त्याचा जीव वाचला. घटनेबाबत जखमी तरुणाने ग्रामीण रुग्णालयात उपचार करून वणी पोलीस ठाण्यात आरोपी नीकेश विठ्ठल होले रा. काझीपुरा व चेतन चिकटे, रा. एकतानगर वणी विरुद्ध तक्रार नोंदविली.
फिर्यादी मो. रजा मो. वसिर रंगरेज (23) रा. विराणी हॉल जवळ वणी हा त्याचे मामा माजी नगरसेवक सिद्दिक रंगरेज यांचे एकता नगर येथील सुलतान बिर्याणी हॉटेल येथे मॅनेजर म्हणून काम करतो. रविवार 6 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता हॉटेल बंद करून घरी जात असताना एकता नगर बोर्ड जवळ निकेश होले व चेतन चिकटे यांनी दारूच्या नशेत त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली.
सोमवार 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता फिर्यादी हा हॉटेल समोर उभा असताना दोन्ही आरोपी मोटरसायकलवर येऊन फिर्यादी याला माफी मांग असे म्हणाले. फिर्यादी मो. रजा यांनी माफी मागण्यास नकार दिला असता निकेश होले यांनी त्याच्या शर्टच्या मागे लपवून ठेवलेला चाकू काढून फिर्यादीचे कमरेवर वार केले. सुदैव म्हणजे चाकू हल्ला होत असल्याचे लक्षात येताच फिर्यादी मो. रजा हा मागे फिरला. त्यामुळे आरोपीने केलेला चाकूचा वार त्याच्या पाठीवर लागला.
हॉटेल बाहेर आरडाओरड होत असल्याचे पाहून हॉटेल मालक सिद्दिक रंगरेज बाहेर आले. त्यांनी आरोपीला पकडुन त्याच्या कडून एक चाकू व विळा हिसकाविला. त्यावेळी आरोपी निकेश होले यांनी फिर्यादी यास जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 118(1), 352, 351(2), 351(3), BNS तसेच 3(5), 4,25 शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला.