वणी टाईम्स न्युज : शहरात अवैध प्रवासी वाहतूक आणि ऑटो चालकांची मनमानी सुरु असताना बस स्थानकासमोर एका मेडिकल व्यावसायिकाने चक्क आपल्या दुकानासमोर ‘अवैध ऑटोरिक्षा स्टँड’ असा फलक लावला आहे. या फलकाची शहरात चांगलीच चर्चा रंगली असून मात्र वाहतूक विभागाचे लक्तरे वेशीवर टांगले गेले आहे.
वणी उप विभागात असलेल्या कोळसा, दगड, डोलोमाईट खाणी तसेच उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. छोटे मोठे अपघात नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी जिल्हा वाहतूक विभागाने वणी येथे उप शाखा कार्यान्वित केली आहे. मात्र वाहतूक शाखेतील कर्मचारी फक्त वसुलीत दंग असल्याचे आरोप होत आहे. वणी शहरातून ग्रामीण भागाकडे जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहने धावतात. शहरात बस स्थानक समोर, टिळक चौक, साई मंदिर चौक, जटाशंकर चौक, गाडगे बाबा चौक, दीपक टॉकीज चौपाटी येथे प्रवासी ऑटोरिक्षाचा जमावडा असतो. हे वाहतूकदार दुकानासमोर ऑटो उभे करून असल्यामुळे व्यावसायिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
बस स्थानक परिसरात ऑटोचालकांची धुमाकूळ नेहमी पाहायला मिळते. ऑटो चालक दुकानदार किंवा इतर प्रवाश्यांना जुमानत नाही. अशातच बस स्थानक समोर माधव मेडिकल स्टोअरच्या संचालकाने अफलातून आयडिया वापरून आपल्या दुकानासमोर दर्शनीभागात चक्क ‘हप्तेखोर वाहतूक कर्मचारी/ लोक प्रतिनिधी यांना समर्पित अवैध ऑटोरिक्षा स्टँड’ असा फलक लावला. या फलकाची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र या फलकाने तरी अवैध प्रवासी वाहतूक बाबत वाहतूक विभाग आणि लोक प्रतिनिधी यांना जाग येईल का ? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.