वणी टाईम्स न्युज : धारदार शस्त्र हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालत असलेल्या ऑटो चालकाला वणी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. राजीव राधेश्याम पर्बत (24) रा. नवीन वागदरा, वणी असे आरोपीचे नाव आहे.
वणी घुग्गुस मार्गावर लालगुडा चौफुली येथे नगराळे टी शॉप समोर एक व्यक्ती हातात धारदार चाकू घेऊन दहशत माजवित असल्याची माहितीवरुन गुन्हा शोध पथकातील कॉन्स्टेबल विकास धडसे, पो.ना. पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसीम, गजानन कुळमेथे, श्याम राठोड लालगुडा चौक येथे पोहचले. पोलिसांनी आरोपीला शरणागती पत्करायला सांगितले असता त्यांनी पोलीसांच्या दिशेने चाकू भिरकावून अटक चुकविण्याचा प्रयत्न केला.
अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करुन आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी कडून तब्बल 40 से.मी. लांबीचा (मुठीसह)एक धारदार चाकू हस्तगत केला. अवैधरीत्या शस्त्र बाळगून धुमाकूळ घालत असल्याची फिर्यादवरून आरोपी राजीव राधेश्याम पर्बत विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.