वणी : तालुक्यातील नांदेपेरा येथील एका युवा शेतकरी पुत्राने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवार 20 मार्च रोजी सकाळी भालर मार्गावर उघडकीस आली. मंगेश प्रभाकर डोंगे (28) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार नांदेपेरा येथील मंगेश डोंगे हा युवा शेतकरी पुत्र आपल्या वडिलाकडे असलेली शेती सांभाळत असे. मागील वर्षीच मंगेशचा लग्न झाला होता. मंगळवारी सायंकाळी मंगेश हा आपली दुचाकी घेऊन घराबाहेर निघाला तर रात्री घरी आलाच नाही. बुधवारी सकाळी वणी भालर मार्गावर डम्पिंग यार्डलगत एक युवक पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भालर मार्गावर जाऊन पाहणी केली असता तिथे एक तरुण मृतावस्थेत आढळला.
मृत व्यक्ती बाबत पोलिसांनी चौकशी केली असता तो नांदेपेरा येथील मंगेश डोंगे असल्याची ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून शव विच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले. लग्न होऊन एक वर्ष होत नाही तर युवा शेतकरी पुत्राने आत्महत्या सारखा पाउल का उचलला, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. मृतक मंगेश याच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन भाऊ व आप्त कुटुंब आहे.