वणी टाईम्स न्युज : वणी परिसरात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून कोळसा खाणी परिसरात दोन वाघांचे दर्शन झाल्यामुळे वेकोलि कामगारांत दहशत निर्माण झाली आहे. शुक्रवार 31 जानेवारी रोजी कोलार पिंपरी कोलमाईन्स विटीसी कार्यालयात कार्यरत दुर्गा धोटे व निशा खोकले ही दोन महिला कर्मचारी वेगवेगळ्या दुचाकीवर ड्युटीवर जात होत्या. दुर्गा धोटेची दुचाकी समोर होती तर काही मीटर अंतरावर मागे निशा खोकले दुचाकीवर होती. दरम्यान कोळसा खाण चेकपोस्ट जवळ निशा खोकलेच्या दुचाकी समोरुन एक पट्टेदार मोठ्या वाघाने रस्ता क्रॉस केला. वाघाला पाहून निशा हिने दुचाकी थांबवली. त्याचवेळी एक दुसरा पट्टेदार वाघ रस्त्यावर आला, पण दुचाकी पाहून तो माघारी फिरला.
पट्टेदार वाघ दिसल्यामुळे घाबरलेल्या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील लोकांना हकीकत सांगितली. तेव्हा काही तरुणांनी येऊन बघितले असता दोन्ही वाघ तब्बल 1 तास ठिकाणी बसून होते. कोळसा खाण परिसरात वाघांचा वावर असल्याने कोळसा खाण आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. कोळसा खाणीत वाघांची उपस्थित बाबत सहायक वन संरक्षक वणी संगीता कोकणे यांना विचारणा केली असता त्यांनी वन कर्मचारी पाठवून घटनेची माहिती घेणार असल्याचे सांगितले.