वणी टाईम्स न्युज : शहरातील दीपक चौपाटी परिसरात शेकडो गोवंशाचे अवैधरीत्या कत्तलीचा प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असताना मात्र दीपक चौपाटी पोलीस बीट हवालदार आणि बीट इन्चार्ज अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या 8 दिवसानंतर ही सदर बीटचा प्रभार त्यांचेकडून काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सदर दोन्ही अधिकाऱ्यावर कुणाचा वरद हस्त आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील दीपक चौपाटी परिसरात अवैध गोवंश कत्तलीचा कारखाना हा मागील एका वर्षापासून सुरु असल्याचे बोलले जाते. दीपक चौपाटी परिसर वणी पोलीस स्टेशन मधील 4 बीटपैकी सर्वात संवेदनशील बीट आहे. येथील पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर हा कत्तलखाना सुरु होता. तेव्हा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती नसेल का ? किंवा त्यांच्या संमतीने हा धंदा सुरु होता.
पोलीस स्टेशन हद्दीतील बीट मध्ये सुरु असलेले मटका, जुगार, दारु व इतर अवैध व्यवसायासाठी बीट जमादाराला जबाबदार ठरवून त्यांचे निलंबन किंवा बदली करण्याची अनेक उदाहरणे पोलीस विभागात आहे. मात्र दीपक चौपाटी बीट मध्ये सांप्रदायिक सौहार्द बिघडविण्याच्या घटनेनंतरही स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभय देण्यात येत आहे. गोवंश जनावर तस्करांचे धागेदोरे वरपर्यंत असल्याने कारवाई होत नसल्याची खमंग चर्चा शहरात आहे.