जितेंद्र कोठारी, वणी : शहरात धूम स्टाईलने तसेच बेशिस्त वाहन चालविणाऱ्या विरुद्ध ट्रॅफिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील 10 दिवसात वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन दुचाकी चालक, तीन सीट, विना लायसन्स आणि इतर गुन्ह्यातील 624 वाहनांवर कारवाई करुन 5 लाख 52 हजाराचा दंड ठोठावला आहे.
दिनांक 22 डिसेंबर रोजी शहरातील वरोरा मार्गावर टिळक महाविद्यालय समोर एका भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे नागोराव आवारी या वृध्द नागरिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे बेशिस्त वाहतूक तसेच वाहतूक पोलिसांविरुद्ध शहरात संतापाची भावना निर्माण झाली होती. रामनवमी उत्सव समिती तर्फे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करुन अल्पवयीन दुचाकी चालक व ऑटो रिक्षा विरुध्द कारवाईची मागणी करुन आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी 23 डिसेंबर पासून धडक कारवाईचा सपाटा लावला. त्यात 16 वर्षाखालील अल्पवयीन असलेले 28 दुचाकी चालकांवर कारवाई करून 1 लाख 40 हजार रुपये दंड ठोठावला. दुचाकीवर ट्रीपल सीट बसून जाताना 42 जणांकडून 42 हजार, विना नंबर वाहन चालविणाऱ्या 17 वाहनांवर 8 हजार 500 रुपये, परवाना नसताना वाहन चालवताना 8 चालकांवर 40 हजार रु. रस्त्यावर धूम स्टाईलने बाईक धोकादायक रित्या वाहन चालविणाऱ्या 5 बाइकर्स कडून 5 हजार रु. दंड पावती फाडण्यात आली.
वाहतूक पोलिसांनी वाहन थांबिण्याच्या इशारा केला असता उल्लंघन करून पळून जाणाऱ्या 59 वाहनांवर 35 हजार 500 रु., दुचाकीची सायलेंसर मोडीफाय करून कर्कश आवाजात दुचाकी चालवताना दोघांकडून 2 हजार तर रेसिंग बाईक चालविणाऱ्या 3 चालकांवर 3 हजार दंडाची चालान फाडण्यात आली. याशिवाय दारु पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर वाहन उभे करणे, ऑटो मध्ये जास्त प्रवासी बसविणे असे एकूण 624 कारवाईमध्ये वाहन चालकांवर 5 लाख 52 हजार 550 रुपयांचा दंड करण्यात आला.
बेशिस्त वाहन चालकांवर लगाम लावण्याची ही कारवाई वाहतूक शाखा प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सीता वाघमारे यांचे नेतृत्वात वाहतूक पोलीस कर्मचारी गोपाल हेपट, सुमित गौरकार, महेश राठोड, किशोर डफळे, प्रदीप भानारकर, रुपाली बदखल, अनुराधा, प्रमोद मडावी, माधुरी भानखेडे, जयश्री गोडे, वासाडे, नवनाथ कल्याणकर, विठ्ठल भंडारे, संतोष फुलवले यांनी केली.