वणी टाईम्स न्युज : मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या सावंगी रेती घाटातून अहोरात्र रेतीचे अवैधरीत्या उत्खनन व वाहतूक सुरु आहे. दररोज शेकडो ट्रक द्वारे जिल्ह्याच्या ठिकाणी रेती पुरवठा केली जात आहे. रेती तस्करांचा पुष्पा पॅटर्न गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वाळू माफियांवर तहसीलदारांनी कारवाईचे अस्त्र उगारले आहे. परंतु ही कारवाई देखावा असल्याचे बोलले जाते.
मारेगाव येथील तहसीलदार उत्तम निलावाड यांनी रेती तस्करी विरुध्द वणी उप विभागात सर्वात जास्त कारवाया केल्या आहेत. परंतु वास्तविक पाहता ज्या प्रमाणात मारेगाव तालुक्यातील रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक होत आहे, त्या अनुषंगाने कार्यवाही नगण्य असल्याची चर्चा आहे. रविवारी पहाटे तहसीलदार यांनी सावंगी रेती घाटातून विना परवाना रेती वाहतूक करणाऱ्या 3 ट्रकवर दंडात्मक कारवाई केली. मात्र त्याच रात्री अनेक ट्रक सावंगी घाटातून रेती भरून निघाल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे सदर कारवाई रेती व्यावसायिकांवर दबाव निर्माण करण्यासाठी आली की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परिवहन विभागाची भूमिका संशयास्पद ..!
रेती वाहतुकीच्या व्यवसायात गुंतलेले अनेक वाहने यमराज बनून रस्त्यावर धावत असल्याचेही उघड झाले आहे. काही वाहने कालबाह्य झाले आहेत, तर काही वाहनाचे परमिट, फिटनेस व इन्शुरन्स अनेक वर्षापूर्वीच एक्सपायर झाले असताना परिवहन अधिकाऱ्याच्या मुक संमतीने महामार्गावर धावत आहे.
परिवहन विभागाच्या संकेत स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पकडण्यात आलेले ट्रक क्रमांक MH13 AX 2093 चे परमिट 6 ऑक्टोबर 2024 रोजी संपले आहे. तर 30 सप्टे. 2020 नंतर वाहनाचा इन्शुरन्स काढण्यात आलेला नाही. 12 सप्टे. 2021 नंतर ट्रकचे फिटनेस सर्टिफिकेटही घेण्यात आले नाही. त्याच दिवशी पकडलेले ट्रक क्रमांक MH29 T 1661 चे फिटनेस प्रमाणपत्र, पीयूसीची कालावधी संपल्याची नोंद आहे. तर इन्शुरन्स 18 डिसेंबर 2025 पर्यंत वैध आहे