वणी टाईम्स न्युज : शेतकऱ्याच्या शेतातून 2 क्विंटल वजनी कापसाचे 3 गाठोडे चोरून नेणाऱ्या 3 चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून चोरलेले 2 क्विंटल कापसाचे गाठोडे व एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. आसिफ शेख इब्राहिम शेख (32), वैभव मारोती मडकाम (24) व शिवाजी उर्फ मिथुन विठ्ठल मरसकोल्हे (32) सर्व रा. कूरई, ता. वणी असे कापूस चोरट्यांचे नाव आहे.
फिर्यादी गिरिधर सीताराम मोहितकर, रा. कुरई यांनी त्यांचे शेतातून 2 क्विंटल कापूस चोरी गेल्याची तक्रार 27 डिसेंबर रोजी शिरपूर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी तांत्रिकरित्या तपास करून कुरई गावातीलच वरील आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी कापूस चोरल्याची कबुली दिली.
आरोपीने दिलेल्या कबुलीवरून पीएसआय रावसाहेब बुधवंत यांनी आरोपीच्या ताब्यातून 2 क्विंटल कापूस किंमत 15 हजार 800 तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली हिरोहोंडा स्प्लेंडर गाडी क्रमांक MH33 J 1115 किंमत 60 हजार असे एकूण 75 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरुध्द कलम 303 (2) BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.