वणी टाईम्स न्युज : येथील तहसील कार्यालय जवळील सेतू सुविधा केंद्राला तहसीलदाराने सील ठोकली. उप विभागीय अधिकारी यांच्या आदेशाने शनिवार 14 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे सोमवारी विविध प्रमाणपत्र व दाखले घेण्यासाठी शहर व ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावं लागले. सेतू केंद्र विरुध्द अनेक तक्रारी असल्यामुळे पुढील 6 महिन्यासाठी सेतू केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती तहसीलदार निखिल धुळधर यांनी दिली आहे.
माहितीनुसार कोणतीही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रामार्फत अर्ज दाखल केल्या जाते. अर्ज दाखल करताना अर्जदाराचे मोबाईल नंबर अर्जावर तसेच प्रमाणपत्रावर टाकणं गरजेचे आहे. मात्र सदर सेतू चालकाकडून बहुतांश अर्जांवर स्वतचे किंवा तेथील कर्मचाऱ्याचे मोबाईल नंबर टाकण्यात आल्याचे यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु अभिप्राय केंद्राने केलेल्या तपासणीत आढळून आले.
उप विभागीय अधिकारी वणी यांनी केलेल्या निरीक्षणात सेतू केंद्र चालविणारा ऑपरेटर व तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे अधिकृत ओळख पत्र नसल्याचेही आढलून आले. शिवाय विविध दाखल्यासाठी शासनाद्वारे निर्धारित रकमेपेक्षा जास्त पैसे आकारणी करण्यात येत असल्याची काही तक्रारी एसडीओकडे आल्याचे सांगण्यात येते. या सर्व तक्रारीबाबत उप विभागीय अधिकारी कार्यालयाकडून सेतू चालकांना नोटीस देऊन खुलासा मागण्यात आला होता. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे शनिवारी सेतू केंद्राला कुलूप लावण्यात आले.
सेतू केंद्रावर कारवाई आताच का ?
वणी येथे तहसील जवळ सेतू सुविधा केंद्र रीद्दी कार्पोरेट कंपनी द्वारा चालविले जात होते. मागील 5 वर्षापासून कंपनीतर्फे यवतमाळ येथील अजय यादव नावाचा व्यक्ती हा सेतू केंद्र चालवीत होता. सेतू केंद्राची देखरेख साठी प्रबंधक व तब्बल 8 मुलं मुली कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कामावर होते. सेतू केंद्रावर गैरप्रकार असल्यास मागील 5 वर्षात अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं नाही का ? तालुक्यात महा ऑनलाईन तर्फे संचालित इतर महा ई सेवा केंद्राबाबत ही अनेक तक्रारी आहे. मग प्रशासन त्या सर्व महा ई सेवा केंद्राला कुलूप लावणार का ? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.