वणी टाईम्स न्युज : वणी येथे सहकारी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सीसीआय तर्फे कापूस खरेदी करण्यात येत आहे. कापूस विक्रीसाठी परिसरातील शेतकऱ्याची गर्दी असून ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे कापूस खरेदी करण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणी आणि टोकण पद्धतीमुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर आमदार संजय देरकर यांनी बुधवारी बाजार समिती व सीसीआय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
बैठकीत आमदार देरकर यांनी सीसीआय अधिकाऱ्यांना धारेवर धरत नोंदणी शिवाय थेट कापूस खरेदी करण्याची तसेच सीसीआय अधिकाऱ्यांनी आमदाराचे आदेश मान्य केल्याची बातम्या सोशल मीडिया व वृत्तमान पत्रात प्रकाशित झाल्या. त्यामुळे गुरुवारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाजार समितीत आणले होते. मात्र ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय कापूस खरेदी करणार नसल्याचे पत्रक बाजार समिती व सीसीआय तर्फे बुधवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत बाजार समिती सचिव अशोक झाडे यांना विचारणा केली असता त्यांनी आमदार महोदय सोबत झालेल्या बैठकीनंतर बाजार समितीकडून टोकण पद्धती बंद करण्यात आली असून ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सीसीआय तर्फे खरेदी केलेल्या कापसाचा चुकारा थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे आधारकार्ड, सातबारा व बँक खात्याची तपशील ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. बाजार समितीत शेतकऱ्याची गर्दी लक्षात घेता नोंदणी काउंटर वाढविण्यात आले आहे. गरज पडल्यास थेट जिनिंगमध्ये नोंदणीची व्यवस्था करु. कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यानं कोणताही त्रास होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ.
हेमंत ठाकरे, (वाणिज्यिक अधिकारी) भारतीय कपास निगम