वणी टाईम्स न्युज : तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना शनिवारी सायंकाळी मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे उघडकीस आली. खुशी सुभाष मोहूर्ले (21), रा. नवरगाव असे मृत तरुणीचे नाव आहे. आई कापूस वेचायला गेली असता घरात एकटी असलेली खुशीने गळफास लावून जीवन संपविला. खुशीची आई सायंकाळी घरी आली तेव्हा ही दुर्देवी घटना उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार मृतक खुशीचे वडिलांचा दहा वर्षांपूर्वी निधन झाले. खुशीच्या दोन बहिणीचे लग्न झाले असून घरात आई आणि ती असं दोघी राहत होत्या. आई मोल मजुरी करून दोघींचे उदरनिर्वाह करायची. घटना उघडकीस येताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आईचा आधार असलेली खुशीने आत्महत्या करण्याचा कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.