वणी टाईम्स न्युज : ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी आलेले वाहन शिवसेना कार्यकर्त्यांनी पकडुन पोलीस ठाण्यात आणले. अशी बातमी एका स्थानिक न्युज पोर्टलवरून व्हायरल झाल्याने गुरुवारी रात्री 9 वाजता वणी पोलीस ठाण्यात हजारो लोकांची गर्दी जमा झाली. निवडणुकीत उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय देरकर, अपक्ष उमेदवार संजय खाडेसह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन आवारात एकच गर्दी केली.
वणी विधानसभेची निवडणूक संपन्न झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तात वरोरा मार्गावर शासकीय गोडवून मध्ये ठेवण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजता पासून सायंकाळी 5 वाजे पर्यंत MH14 LB 9017 क्रमांकाची एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप व्हॅन वरोरा मार्गावर स्ट्राँगरुम पासून काही मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्यामुळे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना ईव्हीएम हॅक करण्याचा संशय आला.
कार्यकर्त्यांनी व्हॅनचा मागील दार उघडुन पहिला असता त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणे व डिश ऍन्टीना ठेवून आढळले. त्यामुळे सदर व्हॅन ईव्हीएम हॅक करण्यासाठीच उभी असल्याचा आरोप करून त्यांनी पिकअप व्हॅन पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारांना फोन करून ठाण्यात बोलाविले. दरम्यान एका उत्साही न्युज पोर्टलने ईव्हीएम मशीन हॅक करणारी वाहन पकडण्याची बातमी व्हायरल केली. त्यामुळे पाहता पाहता पोलीस स्टेशन परिसरात हजारो लोकांची गर्दी जमा झाली.
पोलिसांनी व्हॅन चालकाला विचारणा केली असता वाहनात खाजगी कंपनीचे मोबाईल टॉवर उभारणी करण्याचे साहित्य असून घुग्गुस परिसरात त्यांचे टॉवर उभारणीचे कार्य सुरु असल्याचे सांगितले. उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहरानी यांनी सदर बाबीची खातरजमा करून उपस्थित उमेदवार व कार्यकर्त्यांना सर्व स्थिती समजावून सांगितली. त्यानंतर रात्री 10.30 वाजता दोन्ही उमेदवार, शेकडो कार्यकर्ता व बघ्यांची गर्दी निवळली. एकूणच हा सर्व प्रकरण हा खोदा पहाड, निकली चुहिया सारखा निघाला.