जितेंद्र कोठारी, वणी : मागील 15 दिवसांपासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची मुदत आज सोमवारी सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. त्यामुळे रविवारचा मुहूर्त साधून महाविकास आघाडी व मनसे उमेदवारांनी रविवारी जोरदार प्रचार केला. ढोल-ताशांचा गजर, समर्थकांसह काढलेल्या रॅली, पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पत्रके वाटप आणि मतदारांशी थेट संपर्क करत आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला. शहरात प्रचाराची राळ उडाली अन् आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राजकीय कलगीतुराही जाेरदार रंगला होता.
विधानसभा निवडणूक 15 ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. या निवडणुकीसाठी 22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी हाेता. मतदान बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी होणार असल्याने, प्रचाराचा शेवट सोमवारी सायंकाळी हाेणार आहे. मागील 15 दिवसांत प्रचारसभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच रविवार सुटीचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पायांना भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढला. दारोदारी जाऊन नागरिकांची भेट घेत मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांपर्यंत स्वतःचे नाव, निवडणूक चिन्ह पोहोचवले. यामुळे रविवारी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले हाेते.
शहरात गेल्या महिन्यापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. मविआवचे संजय देरकर, महायुतीचे संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसे उमेदवार राजु उंबरकर, काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार संजय खाडे, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र निमसटकर यांनी मैदानात उतरून जोरदार प्रचार केला. रॅली, सभा, घोंगडी बैठका, कोपरा सभा, घरोघरी भेटी आदींमुळे विधानसभेचे वातावरण ढवळून निघाले होते. आज संध्याकाळी 6 वाजता प्रचाराची सांगता होणार असून छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. उमेदवारांसह मतदारांना देखील मतदानाच्या दिवसांची प्रतीक्षा लागली आहे. 20 नोव्हेंबरला एकाच टप्यात राज्यात मतदान पार पडणार आहे.
उमेदवार देवायचं दारी…
निवडणुकीत उभे असलेले सर्वच उमेदवारांनी मतदार संघातील मतदारांना हात जोडून मत देण्याची विनंती केली. निवडणुकीत मतदार हा राजा असताना मात्र उमेदवारांनी प्रचारादरम्यान गाव खेड्यात प्रत्येक देवळात जाऊन निवडणूक जिंकण्यासाठी देवाला साकडे घातले. कुणी जगन्नाथ महाराजांच्या चरणी लोटांगण झाला, तर काहींनी रंगनाथ स्वामीचे दर्शन करून प्रचाराला सुरुवात केली. तर कुणी मारोतीचे शेंदूर लावले. शेवटी देव करी सो खरी.…