वणी टाईम्स न्युज : पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत दुर्भा येथील अशोक दयालाल भेदोडकर याची 14 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. पाटण ते दुर्भा मार्गावर घडलेल्या या विभत्स हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी दुर्भा येथीलच नवन बद्दमवारसह इतर 3 साथीदारांना स्थानिक गुन्हा शाखा पथकाने खुनाच्या घटनेच्या 24 तासाचे आत अटक केली. अशोकची हत्या पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार झरी तालुक्यातील दुर्भा (जुना) येथील आरोपी . नवनचे वडील अशोक बद्दमवार व मृतक अशोक भेदोडकर यांची शेती लागून असून मागील काही वर्षांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरू होता. नवन अशोक बद्दमवार (29) हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचा रेती तस्करीचा व्यवसाय होता. रेती तस्करीसह त्याच्यावर महसूल अधिकाऱ्याना जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा व इतर गंभीर गुन्हा दाखल दाखल आहे. त्यामुळे नवन बद्दमवार याला तडीपार करण्यात आला होता.
तडीपारीच्या काळात आरोपी नवन बद्दमवार हा महागाव तालुक्यात रेती तस्करीच्या धंद्यात उतरला. तडीपार असताना आरोपी नवन बद्दमवार हा लपून छपून गावात येत होता. तो गावात आल्याची माहिती अशोक भेदोडकर हा पोलिसांना देतो असा नवनला संशय होता. त्यामुळे त्यांनी महागाव तालुक्यातील आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन अशोकचा ‘गेम’ करण्याचा कट रचला.
अशोक भेदोडकर हा दर गुरुवारी आठवडी बाजाराच्या दिवशी भाजीपाला व किराणा आणायला पाटण येथे जात असतो, याची आरोपीला माहिती होती. त्यामुळे खुन करण्यासाठी त्यांनी गुरुवारचा दिवस ठरवला. पूर्व नियोजित योजनेनुसार गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी आरोपी नवन बद्दमवार व त्याचे महागाव तालुक्यातील 3 साथीदार अरुण झांबरे, अनिल आवशे व कैलाश बोडके नवीन दुर्भा ते जुना दुर्भा रस्त्यावर एका नाल्याजवळ दबा धरून बसले. अशोक पाटण येथून भाजीपाला व समान खरेदी करून पायदळ गावाकडे निघाला होता. दरम्यान गोटाली नाल्याजवळ पोहचतात आरोपींनी त्याला घेरले. अशोकला काही समजण्यापूर्वीच आरोपीने धारदार शस्त्राने अशोकच्या गळ्यावर व हनुवटीवर सपासप वार करून त्याचा खुन केला व तिथून पसार झाले.
अशोक भेदोडकर खुन प्रकरणी कोणताही पुरावा नसताना स्थानिक गुन्हा शाखा पथकाने तांत्रिकरित्या तपास करून घटनेच्या 24 तासातच मुख्य आरोपी नवन बद्दमवार सह त्याचा 3 साथीदारांना अटक करून खुनाच्या गून्हाचा उलगडा केला.