वणी टाईम्स न्युज : येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी तयार केलेले ‘नीतिशतकम्’ अभ्यासक्रमाचा नागपूर येथील आर. एस. मुंडले धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे आणि मुंडले महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. मोहन नगराळे यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार तत्त्वज्ञान विभागात हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा जपे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
नागपूर येथील मुंडले महाविद्यालयात या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष बिंझाणी महाविद्यालयाचे डॉ. नरेंद्र रघटाटे यांनी लवकरच विद्यापीठात या अभ्यासक्रमास मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जगभरातील हजारो संस्कृत प्रेमींचा प्रतिसाद लाभलेल्या या अभ्यासक्रमाला यापूर्वी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांनी देखील मान्यता प्रदान केलेली आहे हे विशेष उल्लेखनीय.