वणी टाईम्स न्युज : घरून ट्यूशनला जाण्यासाठी निघालेला अल्पवयीन विद्यार्थी परत घरी परत आलाच नाही. विद्यार्थ्याचे वडिलांनी गावात तसेच वणी शहरात शोध घेतला असता मुलगा मिळून आला नाही. शेवटी मुलाचे वडील अमोल रवींद्र गवळी रा. राजूर (ईजारा) यांनी वणी पोलीस ठाण्यात त्यांच्या 17 वर्ष 8 महिन्याचा अल्पवयीन मुलाला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते वरील ठिकाणी राहत असून त्यांचे स्वतचे ऑटोरिक्षा चालवून उदर निर्वाह करतात. त्यांचा मुलगा अनिरुद्ध अमोल गवळी हा शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात 12 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. तसेच मोहीतकर सर यांच्याकडे ट्यूशनला जात होता. सोमवार 16 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे अनिरुध्द सकाळी 10 वाजता राजूर येथून ट्यूशन जाण्यासाठी निघाला. परंतु दुपारी 2 वाजे पर्यंत तो परत घरी आला नाही.
वडिलांनी अनिरुद्धचे मोबाईलवर कॉल केला असता तो स्विच ऑफ होता. त्यानंतर त्यांनी शहरात येऊन अनिरुध्दच्या मित्रांकडे चौकशी केली. तेव्हा एका मित्राने त्याला मनीष नगर येथे सोडल्याची माहिती दिली. मात्र त्यानंतर अनिरुद्ध कुठे गेला, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अनिरुध्द हा त्याच्या आई वडिलांना एकुलता असून तो बेपत्ता झाल्यामुळे दोघं व्याकूळ झाले. शेवटी वडिलांनी रात्री उशिरा वणी पोलीस ठाण्यात त्यांच्या अल्पवयीन मुलाला कुणीतरी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द कलम 137 (2) BNS नुसार गुन्हा दाखल केला. बातमी लीहेपर्यंत बेपत्ता मुलाचा काही सुगावा लागला नाही.