वणी टाईम्स न्युज : प्रलंबित व सेवा संबंधी तरतुदी पूर्ण न झाल्याने संतप्त तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी बुधवारी आपल्या कडील लॅपटॉप आणि डिजिटल की (DSC) तहसील कार्यालयात जमा केले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना गुरुवार 12 सप्टेंबर पासून शेतीचे 7/12 मिळणे बंद होणार आहे. तालुक्यातील कायर, गणेशपुर, पूनवट, भालर, राजूर, रासा, वणी, शिंदोला, शिरपूर या महसूल साज्यातील 39 तलाठ्यांनी सीलबंद लिफाफ्यात DSC शासनाकडे जमा केली.
राज्यातील तलाठी संवर्गाच्या अनेक मागण्या प्रलंबित असून याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. वेळोवेळी तलाठ्यांच्या वतीने प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलनेही करण्यात आले, परंतु अद्यापही दखल घेतली गेली नाही. यात तलाठ्यांच्या सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध केली नाही. तलाठी सवर्गाच्या बदल्यातील अनियमितता, कालबाह्य झालेले लॅपटॉप प्रिंटर बदलून देण्यात यावे. वेतन निश्चिती व पडताळणी. आंदोलने काळातील करण्यात आलेल्या कारवाईची माहिती, आरक्षणाच्या कामाचे मानधन, अतिवृष्टी व दुष्काळ अनुदान वाटपाच्या कामाचा ०.२५ अनुदान वाटपाचा खर्च, तलाठी कार्यालयाचे भाडे व इतर खर्च, तलाठ्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढणे, अतिरिक्त भार सहा महिन्यात काढणे, गौण खनिज पथकात संरक्षण पुरविणे, कृषी गणनेचा मोबदला, आदिवासी प्रोत्साहन भत्ता, विनंती बदल्या आदी विविध मागण्या प्रलंबित आहेत.
शासनाकडून तलाठी संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहेत. यामुळे तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी डीएससी व लॅपटॉप 11 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात जमा केले. यावेळी विदर्भ पटवारी संघ, उप विभाग वणीचे अध्यक्ष नितेश पाचभाई, सचिव सत्यानंद मुंडे, उपाध्यक्ष मुकेश इंगोले, सह सचिव विशाल मोहितकर, बी.के. सिडाम, एस.जी. उराडेसह तालुक्यातील सर्व तलाठी उपस्थित होते.