वणी टाईम्स न्युज : वणी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात विवाहित युवकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण करुन मातृत्व लादल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विवाहित युवकाविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण पासून संरक्षण कायदा (POCSO) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अट्रोसिटी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार पिडीत मुलगी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गावातीलच एका विवाहित युवकाचे तिच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. मुलीच्या आई वडिलांचे विश्वास संपादन करून तो कधीही घरात यायचा. घरातील काही कामे तसेच मुलीच्या शाळा संबंधी दाखल्याचे कामेही तो तत्परतेने करून द्यायचा. अशातच आरोपीने हळूहळू मुलीला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवून तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आरोपी विवाहित असताना त्यांनी मुलीला लग्नाचे आमिष तसेच विविध प्रलोभने दाखवून अनेक वेळा तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. फेब्रुवारी ते जुलै 2024 पर्यंत आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुळे मुलगी गरोदर राहिली. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना लक्षात आल्यावर त्यांनी विचारपूस केली असता पिडीत मुलीने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सोमवारी रात्री पिडीत मुलीसोबत वणी पोलीस गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी गावातीलच 33 वर्षीय आरोपी युवकाविरुद्ध कलम 64, 64(2)(I), 64(2)(M), 351 (2)(3) BNS तसेच पॉक्सो व अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास एसडीपीओ गणेश किंद्रे करीत आहे.