वणी टाईम्स न्युज : शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू वाहतूक करताना दोघांना मुकुटबन पोलिसांनी अटक केली. गणेशपुर कोसारा मार्गावर मंगळवार 27 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता केलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी आरोपींकडून 10 हजार 800 रुपयांचा तंबाखू आणि दुचाकी जप्त केली आहे. लोमेश बंडू भोयर (25) व रामकृष्ण नारायण पेचे (25) दोघं रा. कान्हाळगाव ता.कोरपना, जि. चंद्रपूर असे आरोपी गुटखा तस्करांचे नाव आहे.
प्रतिबंधित तंबाखू तस्करी बाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन मुकुटबन पोलिसांनी सापळा लावून मोटरसायकलवर येत असलेल्या दोन तरुणांना थांबविले. पोलिसांनी दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाच्या हातातील पांढऱ्या रंगाची चुंगडीची झडती घेतली. त्यामध्ये मजा 108 तंबाखू 200 ग्राम वजनाचे 5 डब्बे, किंमत 4 हजार 675 रु. व ईगल हुक्का शिशा तंबाखू 1 किग्रा. वजनाचे 4 पाउच किंमत 6 हजार 200 रू.असे एकूण 10 हजार 876 रु. किमतीचा प्रतिबंधित तंबाखू आढळला.
पोलिसांनी आरोपींकडून प्रतिबंधित तंबाखू तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो. सा. क्रमांक MH34 CC 6003 किंमत 40 हजार असे एकूण 50 हजार 875 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही ठाणेदार संतोष मनवर यांचे नेतृत्वात PSI प्रवीण हिरे, पोलीस हवालदार दिलीप जाधव, बादल जाधव, कॉन्स्टेबल मंगेश सलाम यांनी केली. दोन्ही आरोपीवर मुकुटबन पोलीस ठाण्यात कलम 223, 274,275 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी उपविभागात मोठ्या प्रमाणात तंबाखू तस्करी
वणी, मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखू तस्करी होत असल्याची अनेक बातम्या वणी टाईम्स न्युज पोर्टलवर प्रकाशित करण्यात आल्या. तस्करांचे नाव, तस्करीचा मार्ग, आणि तंबाखू तस्करीचे मोड्स ओपरेंडी बाबत सर्व खुलासा केल्यानंतरही पोलीस आणि अन्न औषध प्रशासन झोपेचे सोंग घेवून आहे. मुकुटबन पोलिसांनी केलेल्या कार्यवाही वरून तंबाखू तस्करीचा धंदा सुरु असल्याच्या बातम्याला दुजोरा मिळाला आहे.