वणी टाईम्स न्युज : ‘सायबर फ्रॉड’च्या घटना दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत. सायबर चोरटे नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर एकाद्या दिवशी तुमच्याकडे असा फोन आला की, लाडकी बहिण योजनेच्या तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी आढळून आली आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही. तसेच फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची असेल तर आधारकार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स व्हॉटसअपवर पाठवा. तर लगेच सावध व्हा..! सायबर चोरट्यांची नजर लाडक्या बहिणीच्या पैशांवर आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे फोन महिलांना किंवा त्यांच्या लाडक्या नवऱ्याना आल्याची बातम्या समोर येत आहे. असेही निदर्शनास आले की काही भामटे लाभार्थीना बोगस काॅल करून तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याकरिता ओ.टी.पी.मागवून ही रक्कम परस्पर लंपास करीत आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजना लाभार्थीनी बोगस काॅल पासून सावध राहावे.
लक्षात ठेवा, कोणत्याही विभागाकडून व्हॉटसअप वर डॉक्युमेंट मागितले जात नाही. तसेच कोणत्याही बँकेकडून अशाप्रकारे ओ.टी.पी. मागितला जात नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अशाप्रकारे मोबाईलवर आलेले ओटीपी (4 अंकी किंवा 6 अंकी आकडा) कोणालाही देऊ नये. जेणेकरुन तुमची फसवणूक टाळता येईल व रक्कम सुरक्षित राहील. तसेच फसवणूक झाल्यास त्वरित नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 या क्रमांकावर संपर्क साधावा.