जितेंद्र कोठारी, वणी : मुली, तरुणी आणि महिलांचा घर सोडून जाण्याचा प्रमाण अलीकडचा काळात प्रचंड वाढला आहे. त्यात प्रेम प्रकरणातून आमिषाला बळी पडून पळून जाणाऱ्या मुलींची संख्या सर्वाधिक आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातून मुली बेपत्ता होण्याचा प्रमाण जास्त आहे. वणी उपविभाग अंतर्गत मारेगाव, शिरपूर, मुकुटबन आणि वणी पोलीस ठाण्यात मागील सहा महिन्यात दाखल बेपत्ता मुली,तरुणी व महिलांचे आकडे पालकांची झोप उडविणारे आहे.
गेल्या 1 जानेवारी ते 30 जून 2024 पर्यंत वणी, मारेगाव, शिरपूर आणि मुकुटबन पोलीस ठाण्यात 19 ते 40 वयोगटातील 57 मुली व महिला घर सोडून गेल्याची तक्रारी नोंद आहे. यात सर्वात जास्त 21 महिला व तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये आहे. वणी पोलीस ठाण्यात 15, मुकुटबन पो. स्टे अंतर्गत 13 आणि शिरपूर पो. स्टे. हद्दीत 8 तरुणी किंवा महिला विविध कारणांनी गुपचूप घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल आहे.
विशेष म्हणजे बेपत्ता होणाऱ्या महिलांमध्ये 19 ते 25 वयोगटातील कुमारिका आणि नव विवाहित महिलांची संख्या जास्त आहे. या काळात 19 ते 25 वर्ष वयोगटातील 34 तरुणी, महिला यांनी घरातून पलायन केले. तर 26 ते 40 वयोगटातील 23 महिलांनी या 6 महिन्यात विविध कारणांमुळे घर सोडले. यातील काही तरुणी, महिला परत घरी आल्या असाव्यात, तर काही बेपत्ता महिलांचा पोलिसांनी शोध लावला.
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या या काळात अनोळखी पुरूषांसोबत मैत्री होऊन पळून जाण्याचे प्रकार वाढले आहे. चिंतेची बाब म्हणजे 13 ते 18 वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुली आमिषाला बळी पडून घरातून पलायन करण्याचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. शिवाय विवाहित स्त्रियांसुद्दा आपल्या कुटुंब व मुलाबाळांची पर्वा न करता पर पुरूषांसोबत पळून जाण्याचे प्रकार समोर आले आहे.