वणी टाइम्स न्यूज : वणी तालुक्यातील मोहूर्ली येथे एका अल्पवयीन मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. वैभव संजय एरकडे (17) रा. मोहूर्ली असे आत्महत्या करणार्या मुलाचा नाव आहे. मृतक वैभव हा गावालगत नाल्यात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेबाबत वणी पोलिसांना कळविण्यात आले असता पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
मृतक वैभव हा वणीतील एका महाविद्यालयात 12 वीत शिक्षण घेत होता. त्याचे मागे आई वडील, मोठी बहीण व एक लहान भाऊ आहे. वैभव एरकडे यांनी आत्महत्या सारखा टोकाचा पाऊल का उचलला या बाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही. घटनेबाबत वणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास जमादार संतोष आढाव करीत आहे.