जितेंद्र कोठारी वणी : निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची तारखा जाहीर करण्यात आली आहे. याचसोबत निवडणुक भयमुक्त, पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण देशात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे. राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते, प्रतिनिधी तसेच सर्व नागरिकांनी आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी वणी यांचे कार्यालय तर्फे करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने ठरविलेल्या आचार संहितेचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन किंवा भंग होत असल्यास याबाबतची तक्रार C- vigil app द्वारे करण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय 76- वणी विधानसभा या मतदार संघासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 07239- 99260 वर सुद्धा तक्रार नोंदविता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची तत्काळ नोंद घेण्यात येईल.
चंद्रपूर- वणी – आर्णी लोकसभेकरिता येत्या 19 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही समृद्ध होण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.