सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल झरीजामणी येथे सेतू सुविधा केंद्राकडून शासकीय कामासाठी निर्धारित रकमेपेक्षा जास्त पैसे आकारल्याची तक्रार पांढरकडा उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त झाली होती. तक्रारींच्या अनुषंगाने बुधवार 17 जानेवारी रोजी पांढरकडा उपविभागीय अधिकारी यासीनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने झरीजामणी तहसील परिसर व बिरसा मुंडा चौकातील सेतू सुविधा केंद्रावर स्टिंग ऑपरेशन केले. या स्टिंग ऑपरेशनमध्ये सेतू केंद्र चालक महिला एका कामासाठी 1500 रुपयांची मागणी करताना कॅमऱ्यात कैद झाली.
जातीचा दाखला, नॉन क्रीमी लेयर, जन्म दाखला, हैसीयत प्रमाणपत्र असे विविध शासकीय दाखले सेतू सुविधा केंद्रातून बनवले जातात. यासाठी शासनाने प्रमाणपत्राची किंमत निश्चित केली आहे. या कामासाठी कोणताही सेतू केंद्र चालक नागरिकांकडून जास्त पैसे घेऊ शकत नाही. मात्र झरीजामणी येथील सेतू सुविधा केंद्राकडून प्रत्येक कामासाठी निर्धारित दरापेक्षा 50 ते 100 रुपये जादा आकारले जात असल्याच्या तक्रारी एसडीओ यासिनी नागराजन यांना प्राप्त झाल्या होत्या.
तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी एसडीओ विभागाचे पथक येथे पोहोचले आणि त्यांनी सेतू केंद्रात स्टिंग ऑपरेशन केले. सेतू केंद्र चालकाचे नागरिकांशी झालेले संभाषण आणि जादा पैसे घेतल्याच्या घटनेचा छुप्या कॅमऱ्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. या स्टिंग ऑपरेशनमध्ये तहसील कार्यालय समोरील भोयर सेतू सेवा केंद्र आणि बिरसामुंडा चौकातील ओम साई सेतू केंद्राचे संचालक यांनी जादा दर वसूल केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
शासकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासनाने दर आणि कालावधी निश्चित केलेली आहे. जास्त पैसे घेऊन जर कोणी लवकर किंवा खोटे प्रमाणपत्र मिळवून देण्याचा किंवा सेतू केंद्र चालकाने अधिक पैशांची मागणी केल्यास तहसीलदार व उपविभागीय अधिकारी कार्यालयात लेखी अथवा sdokelapur@rediffmail.com या ईमेल वर तक्रार करण्याचे आवाहन एसडीओ नागराजन यांनी केले आहे.