जितेंद्र कोठारी, वणी : अविवाहित अभियंत्याची असामायिक मृत्यूनंतर त्याची बायको असल्याचा दावा करणारी महिलेची याचिका कोर्टाने फेटाळली. तसेच नोकरीचा लाभ व वारसांना हक्क मिळणेकरिता खोटे कागदपत्र सादर करून न्यायालयाची दिशाभूल करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. न्यायालयाच्या आदेशावरून व मृतक अभियंत्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात सदर तोतया बायकोवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कु. रशीदा बेगम सैयद फकरुद्दीन उर्फ सुप्रिया रंगनाथ रुईकर उर्फ श्रीमती राशीदा चंद्रशेखर (40) रा. शारदामाता नगर, दौलत विहार, अमरावती रोड , नागपूर असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार येथील गुरुवर्य कॉलोनीमधील रहिवासी चंद्रशेखर मधुकर कोनप्रतीवार (40) हे सार्वजनिक बांधकाम उप विभाग राजुरा जि. चंद्रपूरमध्ये शाखा अभियंता पदावर नोकरीवर असून ते अविवाहित होते. दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी हृद्यघाताच्या तीव्र धक्यामुले चंद्रशेखर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची आई शकुंतला मधुकर कोनप्रतीवार हिने वारसांना अनुज्ञेय लाभ मिळणे करिता व वारस प्रमाणपत्र मिळणेकरिता दिवाणी न्यायालय वणी येथे दावा दाखल केला.
दरम्यान गैरअर्जदार महिला श्रीमती राशीदा चंद्रशेखर हिने न्यायालयात आक्षेप दाखल करून ती मृतक अभियंत्याची विवाहित पत्नी असल्याचा दावा दाखल केला. सदर महिलेनी न्यायालयात तिचा विवाह मृतक चंद्रशेखर सोबत गणेश टेकडी नागपूर येथे झाल्याचा तसेच त्याच्या पासून दोन अपत्य असल्याचे खोटे दस्तावेज, आधारकार्ड, मुलांची टी.सी. न्यायालयात सादर केले. महिलेने केलेल्या दाव्याबाबत याचीकाकर्ता शकुंतला कोनप्रतीवार हिने चौकशी केली असता सदर महिला 2020 पर्यंत वणी येथील रंगनाथ नगर मध्ये एका व्यक्तीसोबत पत्नी म्हणून राहत होती. व त्या व्यक्तीपासून तिला दोन मुले वणी येथील एका खाजगी रुग्णालयात जन्माला आले. त्याची जन्म नोंद ग्रामपंचायत चिखलगाव येथील झालेली आहे.
सदर महिलेने तिचा विवाह चंद्रशेखर कोनप्रतीवार सोबत गणेश टेकडी नागपूर येथे झाल्याचा दावा करून लग्नाची पत्रिका न्यायालयात सादर केली. मात्र गणेश टेकडी मंदिरात कधीही लग्न होत नसल्याची माहिती गणेश टेकडी देवस्थान संस्थेनी दिली. त्यामुळे महिलेचा हा दावा खोटा ठरला. अनुकंपा नोकरीचा लाभ व पैसे हडपण्या करिता महिलेनी खोटे दस्तावेजाच्या आधारे दावा दाखल केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आले. त्यामुळे आरोपी महिलेचा दावा फेटाळून तिच्यावर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या आदेशावरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी कु. रशीदा बेगम सैयद फकरुद्दीन उर्फ सुप्रिया रंगनाथ रुईकर उर्फ श्रीमती राशीदा चंद्रशेखर (40) रा. शारदामाता नगर, दौलत विहार, अमरावती रोड , नागपूर विरुद्द 4 जानेवारी 2024 रोजी कलम 199, 201, 420, 467, 468, 471 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशात पोलिसांवरही ताशेरे
मृत मुलाची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या त्या महिलेविरुद्द अर्जदार शकुंतला कोनप्रतीवार हिने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी योग्य चौकशी न करता गैरअर्जदार महिलेवर विश्वास ठेवून कोणतीही कार्यवाही केली नाही. तपास कार्यालयाच्या म्हणण्यावरून असे दिसून येते की तपास अधिकार्यांनी प्रतिवादीच्या वक्तव्यावरच विसंबून ठेवले आहे. केवळ प्रतिवादीच्या विधानाच्या आधारे तपास करून अधिकार्यांनी नैमित्तिक केल्याचे दिसून येत असल्याचे ताशेरे कोर्टाने आदेशात ओढले आहे.