वणी : आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची विटंबना केल्या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणवाडी गावातील उपसरपंच संगीता बळवंत कोवे (35) यांनी याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
प्राप्त माहितीनुसार करणवाडी ग्रामपंचायत समोर चौकात लोखंडी खांबाच्या बोर्डावर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची प्रतिमा लावलेली आहे. दिनाकं 17 डिसेंबरच्या रात्रीच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात समाजकंटकाने प्रतिमेच्या चेहऱ्यावर मातीचे काळे डाग लावल्याचे 18 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आले.
बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत असून प्रतिमेची विटंबना केल्यामुळे समाजाची धार्मिक भावना दुखावली गेली. त्यामुळे करणवाडी येथील आदिवासी समाजातील नागरिकांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून प्रतिमेची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा तत्काळ शोध घेऊन कार्यवाहीची मागणी केली आहे. मारेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्द कलम 295 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.